Pune Accident : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सोमवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली असून, एसटी बसच्या धडकेत दुचाकीवरील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, संपूर्ण जुन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
हा अपघात अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील आळेफाटा परिसरात घडला. प्राथमिक माहितीनुसार, कल्याणहून आळेफाट्याकडे येणाऱ्या एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील चारही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करत मृतदेह ताब्यात घेतले. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, मृत सर्वजण एकाच कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या भीषण दुर्घटनेनंतर अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.


