ठाणे: ठाण्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी भविष्यातील व्यापक आंदोलने आणि वाहन कोंडीविरुद्ध मोर्च्यांचा इशारा देण्यात आला. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सत्ताधारी नेत्यांवर रोखठोक टीका करत सरकारविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन केले. अविनाश जाधव यांनी म्हटलं की, ‘आम्ही बाळासाहेबांची ओरिजनल फौज आहोत, आता पैसा टिकणार नाही. ठाण्यात दहशतीचे वातावरण असून दहशतीला घाबरून अनेकजण तिकडे आहेत, आम्ही एकत्रपणे लढू, आम्ही घाबरणार नाही. ठाणेकरांसाठी आम्ही लढणार, असं म्हणत अविनाश जाधव यांनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-मनसे युतीचे संकेत दिले.
दरम्यान, यावेळी अविनाश जाधव म्हणाले की, 4 हजार कोटींच्या महापालिकेला या लोकांनी बरबाद केले, या लोकांनी पालिका लुटून खाल्ली. ज्यावेळी आमची सत्ता येईल, तेंव्हा सर्वांची चौकशी लाऊन यांना आत टाकू, असा कडक इशाराही जाधव यांनी यावेळी सत्ताधारी नेत्यांना दिला.
तथापी, शिवसेनेचे माजी आमदार राजन विचारे यांनीही महापालिकेतील आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासनिक दुर्लक्षावर खळबळजनक आरोप केले. विचारे म्हणाले की २०१७ ते २०२५ या कालखंडात महापालिकेत निवडणुका न घेतल्यामुळे जबाबदाऱ्या पाळल्या गेल्या नाहीत. पालिकेच्या खजिनीत कोट्यवधींचा विसर आहे आणि विविध निधींचा वापर अस्पष्ट आहे. त्यांनी अनधिकृत बांधकामे, अधिकार्यांना अनावश्यक बढती देणे आणि पाण्याच्या टँकरच्या लॉबीप्रकरणीही प्रश्न उपस्थित केले. दोन्ही पक्षांनी स्थानिक नागरिकांना सोमवारी होणाऱ्या ‘धडक मोर्चा’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


