Babasaheb Patil Controversial Statement: राज्यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक भागात ओला दुष्काळ पडला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांकडून कर्जमाफी, दुष्काळ जाहीर करण्याच्या मागण्या जोर धरू लागल्या आहेत. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने आठवत शेतकरी सरकारकडे आपला रोष व्यक्त करत आहेत, तर विरोधकांकडूनही सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी मदतीच्या घोषणाही होत असताना, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी चोपडा येथील दीपज बँकेच्या शाखा उद्घाटन कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे नवा वाद उफाळला आहे. बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे की, ‘लोकांनी काय मागायचं ते आधी ठरवावं. लोकांना कर्जमाफीचा नाद आहे. त्यामुळे निवडणुकीत लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही आश्वासने देतो.’ त्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, बाबासाहेब पाटील हे लातूरसारख्या दुष्काळी भागातून आलेले मंत्री आहेत. शेतकऱ्यांचा कर्जबाजारी होण्यामागे सरकारच्या धोरणांचा परिणाम आहे. जे मंत्री कर्जमाफीला नाद लागला असे बोलत आहेत, ते निर्लज्जपणाचे कळस आहे. शेतकऱ्यांची थट्टा करण्याऐवजी त्यांनी वास्तविक परिस्थिती समजून घेतली पाहिजे.
हेही वाचा – मोठी बातमी! पूरग्रस्तांसाठी सरकारकडून 31 हजार 628 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर; शेतकऱ्यांना काय-काय मिळणार?
राजू शेट्टी यांनी हे देखील सांगितले की, जबाबदार मंत्र्यांनी केंद्र सरकारकडे जाऊन शेतकऱ्यांचे कर्ज वाढण्यामागचे धोरण स्पष्ट करावे, असे अपेक्षित आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापले असून, शेतकरी वर्गाचे रोष आणि विरोधकांचा दबाव सरकारवर वाढला आहे.


