Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसील कार्यालयात घडलेल्या आत्महत्येच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शेतकरी परमेश्वर मेश्राम (वय ५५) यांनी २६ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान ७ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप राजकीय वर्तुळात आणि प्रशासनात मोठी खळबळ माजवणारे आहेत.
मेश्राम यांच्या कुटुंबाचा आरोप आहे की, दिवंगत खासदार बाळू धानोरकर आणि त्यांच्या भावावर अनिल धानोरकर, तसेच खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर या आत्महत्येला कारणीभूत ठरण्याचा संशय आहे. कुटुंबीयांच्या मते, जमिनीच्या व्यवहारात झालेल्या फसवणुकीमुळे आणि सततच्या त्रासामुळे परमेश्वर मेश्राम यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
जमीन व्यवहाराचा वाद
भद्रावती तालुक्यातील कुरोडा गावात ८.५ एकर वडिलोपार्जित जमीन मेश्राम यांच्या नावे होती. २००६ साली त्यांनी ही जमीन दिवंगत बाळू धानोरकर यांना विक्रीस दिली, मात्र विक्रीचे पैसे कधीच मिळाले नाहीत, असा कुटुंबाचा आरोप आहे. दिलेले चेक वारंवार बाउन्स झाल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणी परमेश्वर मेश्राम यांनी कोर्टात दावा दाखल केला होता आणि केसचा निकाल त्यांच्या बाजूने लागला होता. तरीसुद्धा, गेल्या दोन वर्षांपासून तहसील कार्यालयातून जमिनीचा फेरफार (Mutation) करण्यात टाळाटाळ सुरू होती. धानोरकर कुटुंबीयांचा दबाव असल्याने जमीन त्यांच्या नावावर नोंदवली जात नसल्याचा गंभीर आरोप मेश्राम कुटुंबीयांनी केला आहे.
कुटुंबाचा आक्रमक पवित्रा
परमेश्वर मेश्राम यांच्या मृत्यूनंतरही प्रकरण शांत झालेले नाही. त्यांचा मृतदेह तिसऱ्या दिवशीही शवगृहातच ठेवण्यात आला आहे. कुटुंबीयांनी ठाम भूमिका घेतली आहे की, जमिनीचा सातबारा आमच्या नावावर झाला नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. कुटुंबीयांनी प्रशासनाकडे जमिनीचा फेरफार त्यांच्या नावावर करणे, धानोरकर कुटुंबाकडून ताबा मिळवून देणे आणि पोलीस संरक्षण देणे या मागण्या केल्या आहेत.
या घटनेमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्यासाठी चौकशी सुरू असून, भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांना ३ ऑक्टोबर रोजी निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच, आत्महत्येमागील कारणांचा तपास करण्याची मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून जोर धरू लागली आहे.


