Rajvir Jawanda Passes Away: पंजाबमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. लोकप्रिय गायक राजवीर जावंदा यांचे बुधवारी वयाच्या ३५व्या वर्षी निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी, २७ सप्टेंबर रोजी झालेल्या दुर्दैवी दुचाकी अपघातानंतर ते मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात उपचार घेत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर आज त्यांनी मृत्यूशी झुंज हरली. त्यांच्या अचानक जाण्याने चाहते, सहकारी कलाकार आणि संपूर्ण पंजाबी मनोरंजन उद्योग शोकमग्न झाला आहे. अपघातानंतर राजवीर यांच्या डोक्याला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. सुरुवातीला त्यांना बड्डी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने फोर्टिस हॉस्पिटल, मोहाली येथे हलवण्यात आले. वैद्यकीय उपचारांनंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.
गायकाच्या प्रकृतीची पाहणी करण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी स्वतः रुग्णालयात भेट दिली होती. तसेच, गायक अॅमी विर्क यांनी १ ऑक्टोबर रोजी त्यांच्या आरोग्याबद्दल माहिती देत राजवीरचे हृदयाचे ठोके स्थिर आहेत असे सांगितले होते. मात्र त्यानंतर प्रकृती पुन्हा बिघडली आणि अखेर त्यांनी प्राण सोडले.
View this post on Instagram
राजवीर जावंदा हे ‘काली जवंदे दी’, ‘मेरा दिल’, ‘सरदारी’ आणि इतर अनेक हिट गाण्यांसाठी ओळखले जातात. त्यांचे गाणे आणि उत्साही स्टेज परफॉर्मन्सने त्यांनी चाहत्यांच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटवला होता. तसेच, त्यांनी पंजाबी चित्रपटांतही अभिनय केला होता. बाईक रायडिंगची त्यांना विशेष आवड होती आणि ते अनेकदा डोंगरातील राईड्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असत. राजवीर यांच्या निधनामुळे पंजाबी संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. चाहत्यांकडून सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.


