पुणे: देशभरात खोकल्याच्या औषधांमुळे लहान मुलांचे मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आता पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आहेत. मध्य प्रदेशात तब्बल 19 बालकांचा मृत्यू झाल्यानंतर इतर राज्यांतही अशा घटना समोर येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) सतर्क झाला असून, पुण्यात मोठी छापेमारी करण्यात आली आहे. पुण्यातील रेडनेक्स फार्मासिटिकल प्रायव्हेट लिमिटेड या औषध कंपनीवर FDAने कारवाई करत ‘रेसपिफ्रेश टीआर’ या खोकल्यावरील सिरपचा मोठा साठा जप्त केला आहे. या औषधामध्ये डायथिलीन ग्लायकॉल (DEG) या विषारी औद्योगिक रसायनाचे प्रमाण धोकादायक पातळीवर असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती FDAचे सहआयुक्त गिरीश हुकरे यांनी दिली.
अलीकडेच मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये ‘कोर्ड्रफ’ आणि ‘नेस्ट्रो डी एस’ या खोकल्याच्या सिरपचे सेवन केल्यानंतर 19 बालकांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आली होती. त्यानंतर महाराष्ट्रातही सर्व खोकल्यावरील औषध उत्पादक कंपन्यांची सखोल तपासणी सुरू करण्यात आली आहे. मेडिकल स्टोअर्स आणि सरकारी रुग्णालयांतील सिरपचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
हेही वाचा – चिमुकल्यांच्या मृत्यूचं तांडव काही थांबेना! कफ सिरप प्यायल्याने नागपूरात 18 महिन्याच्या मुलीचा मृत्यू
हुकरे यांनी स्पष्ट केले की, ज्यामुळे इतर राज्यांमध्ये मृत्यू झाल्याचा संशय आहे, ती औषधे महाराष्ट्रात उपलब्ध नाहीत. तरीही, खबरदारीचा उपाय म्हणून सर्व कफ सिरपचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. तथापी, दोन वर्षांखालील बालकांना कोणत्याही प्रकारचे कफ सिरप देऊ नये, असा स्पष्ट आदेश केंद्र सरकारने दिला आहे. FDAच्या या कारवाईनंतर राज्यभरात औषध सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत असून, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


