Pune News : पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांड प्रकरणात तपासाचा फास अधिक घट्ट होत असून पुणे ग्रामीण पोलीस दलातील आणखी चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापतीशी संपर्क असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अजित काळे, सुमीत वाघ, रामदास जगताप आणि सुभाष डोईफोडे यांचा समावेश आहे. या कारवाईनंतर पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण पोलीस दल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील निलंबित अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या 29 वर पोहोचली आहे.
29 जणांवर कारवाई
- पुणे शहर पोलीस दलातील 3 कर्मचारी
- पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील 6 कर्मचारी
- राज्य उत्पादन शुल्क विभागातील 13 अधिकारी-कर्मचारी
- पुणे ग्रामीण पोलीस दलातील 7 कर्मचारी
22 जणांचा मृत्यू
पुणे-पिंपरी परिसरातील विषारी हातभट्टी दारूमुळे आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तपासात ही दारू फुगेवाडी परिसरात तयार होत असल्याचे उघड झाले असून राज्यभरात अवैध दारू व्यवसायाविरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे.
अंबादास दानवेंची मागणी
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे यांनी केवळ निलंबन पुरेसे नसल्याचे म्हटले आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. “अवैध दारूचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती असूनही कारवाई झाली नाही, त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांवरही फौजदारी कारवाई झाली पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विषारी दारूकांडाच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता असून, संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी सुरू आहे.


