Sangli Crime: सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे हुंड्यामुळे आणखी एका विवाहितेचा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फक्त दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या अमृता ऋषिकेश गुरवने सासरच्यांकडून होणाऱ्या छळ आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर रविवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अमृताचा प्रेमविवाह 26 डिसेंबर 2024 रोजी झाला होता. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच तिच्या पती ऋषिकेश अनिल गुरव आणि सासरकडील सदस्यांनी सासू अनुपमा यांच्या आजारपणाच्या खर्चासाठी माहेरातून 2 लाख रुपये आणण्याची मागणी सुरू केली. ही मागणी पूर्ण करण्यासाठी अमृताचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला.
सासूसह नणंद ऋतुजा आणि मामा नंदकिशोर पांडुरंग गुरव यांनीही अमृताचा वारंवार अपमान केला. विशेष म्हणजे, मामा नंदकिशोर यांनी अमृताच्या पतीला ‘तू अमृताला सोड, मी तुझे आपल्याच जातीतील मुलीशी लग्न लावून देतो,’ असं आश्वासन दिलं. यामुळे अमृताला मानसिक छळाला सामोरं जावं लागलं.
हेही वाचा – दुःखद घटना..! मुलाची आत्महत्या, १२ तासात बापानेही मृत्यूला कवटाळले, बाप-लेकाच्या निधनाने नांदेड हादरलं
या सर्व प्रकाराला कंटाळून अमृताने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर अमृताला इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. तिथे प्रकृती खालावल्यामुळे कोल्हापूर येथील रुग्णालयात हलवले, जिथे रविवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर इस्लामपूर पोलिसांनी पती ऋषिकेश अनिल गुरव, सासू अनुपमा अनिल गुरव, सासरा अनिल मधुकर गुरव, नणंद ऋतुजा अनिल गुरव आणि मामा नंदकिशोर पांडुरंग गुरव यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


