नवी दिल्ली : फुफ्फुस प्रत्यारोपण झालेल्या महिला पुरुषांपेक्षा पाच वर्षे अधिक जगण्याची शक्यता जास्त असते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. महिलांना फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी पुरुषांच्या तुलनेत सरासरी सहा आठवड्यांपेक्षा जास्त दिवस प्रतीक्षा यादीत राहावे लागते, असे ईआरजे ओपन रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात म्हटले आहे.
या अभ्यासात सहभागी १,७१० व्यक्तींपैकी ८०२ महिला आणि ९०८ पुरुष होते. प्रत्यारोपणानंतर सुमारे सहा वर्षे रुग्णांवर लक्ष ठेवण्यात आले. यादरम्यान रुग्णांना सर्वाधिक प्रभावित करणारे क्रॉनिक ऑब्स्ट्रॅक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, सिस्टिक फायब्रोसिस हे मुख्य आजार असल्याचे दिसून आले.
डॉ. टिसॉट यांच्या संशोधनात आढळून आले की, फुप्फुस प्रत्यारोपणासाठी महिलांना सरासरी ११५ दिवस, तर पुरुषांना ७३ दिवस वाट पाहावी लागत होती. प्रत्यारोपणानंतर, महिलांचा जगण्याचा दर पुरुषांपेक्षा जास्त होता, प्रत्यारोपणानंतर पाच वर्षे जिवंत राहिलेल्या महिलांची संख्या ७० टक्के तर पुरुषांची संख्या ६१ टक्के होती.


