Rohit Pawar On Praful Patel: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आज एका खळबळजनक पत्रकार परिषदेत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर अवघ्या १८ दिवसांत पक्षाचे संविधान बदलून सर्व अधिकार स्वतःकडे घेण्याचे कारस्थान प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी रचले होते, असा सनसनाटी दावा रोहित पवारांनी केला आहे. “राजकारण लय वंगाळ (घाणेरडे) झाले आहे,” असे म्हणत त्यांनी सुनेत्रा पवार यांना या अंतर्गत कटाबाबत सावध केले आहे.
सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवून ‘निवडणूक आयोगा’ला पत्र?
रोहित पवारांच्या दाव्यानुसार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला एक गुप्त पत्र पाठवले होते. या पत्रात पक्षाच्या घटनेत बदल केल्याचे खोटे सांगून, अध्यक्षांच्या अनुपस्थितीत सर्व अधिकार कार्याध्यक्षांकडे (प्रफुल पटेल) राहतील, असे नमूद करण्यात आले होते. मात्र, या कारस्थानाची कुणकुण लागताच सुनेत्रा पवार यांनी तातडीने आयोगाला पत्र लिहून, “मी अध्यक्ष होईपर्यंत झालेला कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये,” असे स्पष्ट केले. यावरून पक्षात सत्तेसाठी किती टोकाचा संघर्ष सुरू आहे, हे उघड झाले आहे.
अपघात की घातपात? ‘काळ्या जादू’चा खळबळजनक उल्लेख
या प्रकरणात रोहित पवारांनी थेट ‘गुन्हेगारी तपासाची’ (Criminal Investigation) मागणी केली आहे. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे अत्यंत धक्कादायक आहेत. “अजितदादा जिवंत असतानाच त्यांच्या घराबाहेर नाशिकच्या भोंदूबाबाच्या मदतीने ‘ब्लॅक मॅजिक’ (काळी जादू) किंवा संशयास्पद विधी करण्याचा प्रयत्न झाला होता का? २८ जानेवारीचा तो अपघात खरोखरच नैसर्गिक होता की तो घडवून आणलेला घातपात होता?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. तसेच, अपघातानंतरही VSR कंपनीला ८० ते ९० कोटी रुपये का दिले गेले, या आर्थिक व्यवहाराचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कर्नाटकात ‘झिरो एफआयआर’ आणि कायदेशीर लढाई
रोहित पवारांनी माहिती दिली की, त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली असून, कर्नाटकात जाऊन ‘झिरो एफआयआर’ दाखल केला आहे. “प्रफुल पटेल आणि तटकरे यांना संपूर्ण पक्ष आपल्या नियंत्रणात हवा होता, म्हणूनच त्यांनी अधिवेशनातही दादांच्या अपघातावर कोणाला बोलू दिले नाही,” असा आरोप त्यांनी केला. पियूष गोयल यांनी प्रफुल पटेलांबाबत केलेले विधान हा देखील एका मोठ्या कटाचा भाग असल्याचे सांगत रोहित पवारांनी प्रकरणाचे गांभीर्य वाढवले आहे.


