Nanded Crime : सरपंचपदाची निवडणूक लढवण्यासाठी तीन अपत्यांचा अडसर ठरू नये, यासाठी एका जन्मदात्या पित्याने आपल्या सात वर्षांच्या चिमुकल्या मुलीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हा आरोपी पिता मुलीला तेलंगणात नेऊन कॅनॉलमध्ये फेकून पसार झाला, अशी माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपीचे नाव पांडुरंग कोंडामंगले (वय 32) असून तो मुखेड तालुक्यातील केरूर गावाचा रहिवासी आहे. पांडुरंगचा बाऱ्हाळी येथे हेअर कटिंगचा व्यवसाय असून त्याला तीन अपत्ये आहेत.
महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी तीन किंवा त्यापेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्यांना अपात्र ठरवण्याचा नियम आहे. त्यामुळे सरपंचपदाची निवडणूक लढवण्याच्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठीच हा अमानुष प्रकार घडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
मुलीला सोबत नेलं… आणि परत आला एकटाच
तीन दिवसांपूर्वी पांडुरंग कोंडामंगले याने साहित्य खरेदीसाठी बाहेर जात असल्याचं पत्नीला सांगितलं आणि सात वर्षांची चिमुकली प्राची कोंडामंगले हिला सोबत घेऊन निघून गेला. त्यानंतर तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरात बोधन रोडवरील कॅनॉलमध्ये प्राचीला फेकून दिल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपी घरी एकटाच परतला.
दरम्यान, कॅनॉलमध्ये एका लहान मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला.
संशयावरून अटक; नेमकं कारण तपासात
तपासादरम्यान संशय बळावल्याने 30 जानेवारी रोजी तेलंगणा पोलिसांनी मुखेड येथे येऊन पांडुरंग कोंडामंगले याला ताब्यात घेतले आणि चौकशीनंतर अटक केली. सुरुवातीला आर्थिक विवंचना कारणीभूत असल्याची चर्चा होती. मात्र, आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाचा उमेदवार होण्याची तयारी आणि तीन अपत्यांचा नियम, या पार्श्वभूमीवर निवडणुकीतील अडथळा दूर करण्यासाठीच मुलीचा बळी घेतल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
नांदेड जिल्हा हादरला
या अमानुष घटनेने संपूर्ण नांदेड जिल्हा हादरून गेला आहे. हत्येचं नेमकं कारण काय, याचा सखोल तपास पोलीस करत असून, पुढील चौकशीतून काय धक्कादायक माहिती समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


