मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससह संपूर्ण राजकीय वातावरणावर या घटनेचा परिणाम जाणवत असून, सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवरही या दुर्घटनेचा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पवार कुटुंबीय दु:खातून सावरत हळूहळू सार्वजनिक आणि राजकीय जबाबदाऱ्या स्वीकारत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी कराड येथील प्रीतिसंगममध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच, अजित पवारांसोबत झालेल्या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; या आठवड्यात बैठक नाही
अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर बारामती येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. त्यानंतर त्यांचे अस्थिकलश राज्यभर कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी पाठवण्यात आले. आज विविध जिल्ह्यांमध्ये अस्थिकलश दर्शनावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भावुक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
याच पार्श्वभूमीवर, आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या आठवड्यात कोणतीही कॅबिनेट बैठक होणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सध्या पवार कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आणि पदाधिकारी बारामतीत दाखल होत असून, सुनेत्रा पवार सध्या बारामतीतच उपस्थित आहेत.
सुनेत्रा पवार 9 फेब्रुवारीला मंत्रालयात
राज्य मंत्रिमंडळाची नियमित बैठक दर मंगळवारी होत असते. मात्र, अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेलं शोक वातावरण आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित राहणार का, या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत, तर 9 फेब्रुवारी रोजी त्या प्रथमच मंत्रालयात उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर त्यांच्या प्रशासकीय कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आजही बारामतीत अजित पवारप्रेमी नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.


