Farmers Loan Waiver : राज्यातील गरीब शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारकडून केली जाणार असून, शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल, असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
फार्महाऊसधारक किंवा धनदांडग्या शेतकऱ्यांचा विचार न करता, वर्षानुवर्षे शेतात राबणाऱ्या गरीब शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
धाराशिव जिल्ह्यातील येणेगुर येथे आयोजित सभेत बावनकुळे बोलत होते. कर्जावर व्याज आणि व्याजावर व्याज वाढत असल्याने शेतकरी आत्महत्येचा विचार करतो, मात्र अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
गरीब शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखणार : बावनकुळे
“गरीब शेतकरी 40-40 वर्षे शेतात राबतो. कर्जबाजारीपणामुळे तो आत्महत्येचा विचार करतो. मात्र, या शेतकऱ्यांना आम्ही आत्महत्या करू देणार नाही,” असं भावनिक वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. पुढील काळात शेतकऱ्यांना वारंवार कर्ज घ्यावं लागू नये, यासाठीही सरकार विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
या वक्तव्यामुळे महायुती सरकारकडून लवकरच शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कर्जमाफीची अधिकृत घोषणा नेमकी कधी होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कर्जमाफी फक्त गरीब शेतकऱ्यांसाठी; निकष अजून स्पष्ट नाहीत
मात्र, कर्जमाफी फक्त गरीब शेतकऱ्यांनाच मिळणार असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केल्याने काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
गरीब शेतकऱ्यांचे नेमके निकष काय असतील?
कोणते शेतकरी या योजनेत बसणार आणि कोणते वगळले जाणार?
शेतकऱ्यांची गरिबी ठरवण्याचा मापदंड काय असेल?
काँग्रेसशासित राज्यांत योजना बंद, महाराष्ट्रात सुरूच : बावनकुळे
दरम्यान, काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये लाडकी बहीण योजना बंद करण्यात आली असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. मात्र, भाजपशासित राज्यांमध्ये ही योजना सुरू असून, महाराष्ट्रातही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना सुरूच राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
यासोबतच, केंद्र सरकारच्या ‘एक कोटी लखपती दीदी’ योजनेचा उल्लेख करत, आता राज्यातील महिलांना विनातारण, विनाहमी पाच लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज मिळणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. बावनकुळे धाराशिव जिल्ह्यातील येणेगुर येथे जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारसभेत बोलत होते.


