मुंबई : एसटी महामंडळाने प्रवाशांना आरक्षणात सवलत देण्याचा निर्णय घेत प्रवाशांच्या आनंदात भर टाकली आहे. यामध्ये प्रवाशांनी कमी गर्दीच्या हंगामात प्रवास करताना आगाऊ आरक्षण केल्यास त्यांना १० ते १५ टक्के सवलत मिळणार आहे.
गणेशोत्सव, दिवाळी, होळी, उन्हाळी सुट्टी या काळात प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. आरक्षण मिळणे जिकिरीचे ठरते. यामध्ये मुंबईहून आपल्या मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण सर्वाधिक असते. एसटी बसेसचे आरक्षण न मिळाल्याने खासगी बसेसच्या दुप्पट, तिप्पट तिकीट दराला सामोरे जावे लागते. हीच बाब ओळखून एसटी महामंडळाने गर्दीच्या हंगामात आगाऊ तिकीट आरक्षणावर सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटीची आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेत एसटीला उभारी दिली जात असताना या निर्णयाने देखील एसटीच्या महसुलात वाढ होईल, असा विश्वास एसटी महामंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे.


