Weather Updates : महाराष्ट्रात हवामानाचा लहरीपणा कायम असून आता नव्या संकटाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळीय प्रणाली तयार होण्याचे संकेत मिळत असून पुढील ४८ ते ७२ तासांत चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. दरम्यान, राज्यातील अनेक भागांत उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबईसह संपूर्ण महामुंबई परिसरात तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून ६ मेपासून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मुंबईत तापमान ३६ अंशांच्या पुढे जाणार
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ६ ते ८ मे दरम्यान मुंबईतील कमाल तापमान ३६ अंश सेल्सियस किंवा त्याहून अधिक नोंदवले जाऊ शकते. वातावरणातील वाढती आर्द्रता आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.
खालच्या स्तरावर उत्तर आणि ईशान्येकडून येणारे उष्ण वारे तसेच महाराष्ट्रावर निर्माण होणारी प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थिती यामुळे उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे. ही स्थिती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता
हवामान तज्ज्ञांच्या मते, या आठवड्याच्या अखेरीस केरळ किनारपट्टीलगत अरबी समुद्रात चक्रीवादळीय प्रणाली निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या समुद्रातील वातावरणीय स्थिती चक्रीवादळ निर्मितीस पोषक बनत असून, पुढील ४८ ते ७२ तासांत याबाबत अधिक स्पष्ट माहिती मिळणार आहे.
मात्र, या संभाव्य प्रणालीचा महाराष्ट्रावर थेट मोठा परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचे प्राथमिक संकेत आहेत. हवामान विभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.
चिखलदऱ्यातही उष्णतेचा फटका
थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यातही तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे. यामुळे पर्यटकांनी या पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवली असून, मे महिन्यात गर्दीने फुलणारे चिखलदरा यंदा ओस पडल्याचे चित्र आहे. पर्यटनस्थळांवरील अनेक दुकाने बंद असून, वाढत्या उष्णतेमुळे पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.


