मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या मुंबई जिल्हा अध्यक्षा आणि दिग्गज नेत्या राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. राखी जाधव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत पक्षाची कमान एकहाती सांभाळली होती. त्यांच्या जाण्याने शरद पवार गटाची मुंबईतील संघटना कमकुवत होण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे बंधूंच्या (शिवसेना उबाठा आणि मनसे) युतीत शरद पवार गटाला अवघ्या १० ते १२ जागा मिळाल्या आहेत. यापूर्वी पक्षाने ५० जागांची मागणी केली होती, मात्र अपेक्षित जागा न मिळाल्याने राखी जाधव प्रचंड नाराज होत्या. याच नाराजीमुळे त्यांनी भाजपची वाट धरली आहे. त्यांना घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या प्रभावाच्या वॉर्डातून उमेदवारी मिळू शकते.
दरम्यान, कमी जागांमुळे शरद पवार गटातील असंतोष वाढला आहे. रविवारी रात्री माजी नगरसेवक धनंजय पिसाळ, मनीष दुबे, यामिनीबेन पंचाल, नितीन देशमुख, अशोक पांचाल आदी नेत्यांनी थेट अजित पवार गटात प्रवेश केला. पक्षश्रेष्ठींकडून इच्छुक उमेदवारांना अजित पवार गटात जाण्याची सूचना मिळाल्याने हा असंतोष वाढला. आजही अनेक पदाधिकारी अजित पवार गटात जाण्याची शक्यता आहे.
राखी जाधव यांनी मुंबईत पक्षाची बांधणी आणि कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या जाण्याने ठाकरे बंधूंच्या युतीला फायदा होऊ शकतो, मात्र शरद पवार गटासाठी हा मोठा राजकीय झटका मानला जात आहे. मुंबई महापालिकेत एकूण २२७ जागा असून, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.


