Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या छाननीवरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांकडून यापूर्वी मिळालेल्या अनुदानाची कोणतीही वसुली केली जाणार नसल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या पडताळणी प्रक्रियेत मोठ्या संख्येने अर्ज अपात्र ठरल्याची माहिती समोर आल्यानंतर लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अपात्र महिलांना मिळालेली रक्कम परत करावी लागेल का, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, सरकार अशा महिलांकडून कोणत्याही प्रकारची रक्कम वसूल करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे, योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात सरकार कठोर भूमिका घेणार आहे. तपासात सुमारे 14 हजार पुरुषांनी चुकीची माहिती देऊन किंवा बनावट पद्धतीने अर्ज करून योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. अशा सर्व पुरुष लाभार्थ्यांकडून शासनाने दिलेली संपूर्ण रक्कम वसूल केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच, कागदपत्रांतील त्रुटी किंवा केवायसी प्रक्रियेतील अडचणींमुळे अपात्र ठरलेल्या महिलांनाही सरकारने दिलासा दिला आहे. ज्या महिलांकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध आहेत आणि त्या स्वतःला पात्र समजतात, त्यांच्यासाठी भविष्यात पुन्हा एकदा केवायसी विंडो खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र महिलांना त्रुटी दुरुस्त करून पुन्हा योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.
या निर्णयामुळे अपात्र ठरलेल्या लाखो महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता असून, योजनेतील गैरप्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.


