पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरणासंदर्भात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि दिर सुशील हगवणे यांना अटक केली आहे. सात दिवस फरार राहिल्यानंतर त्यांना स्वारगेट येथून अटक करण्यात आली. शवविच्छेदन अहवालानुसार, वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयात वैष्णवीचे शवविच्छेदन झाले असून डॉ.जयदेव ठाकरे आणि डॉ. ताटिया यांनी दिलेल्या अहवालात उघड झाले आहे. अधिक तपासणीसाठी अवयव आणि इतर नमुने राखून ठेवण्यात आलेले आहेत. वैष्णवीच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या होत्या. ही खळबळजनक माहितीसमोर आल्यानंतर सखोल चौकशीची मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली आहे.

दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे नऊ महिन्यांचे बाळ तिच्या सासरच्यांनी लपून ठेवले होते. तथापि, बाळाच्या कंबरेवर एक गाठ दिसून आली आहे. वैष्णवीच्या मुलाला झोपेचे इंजेक्शन देण्यात आल्याचा संशय तिच्या कुटुंबाला आहे.
ससून रुग्णालयाने दिलेला रिपोर्ट समोर आल्यानंतर ही आत्महत्या आहे की हत्या? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी हत्येच्या दिशेने तपास करावा, अशी मागणी वैष्णवीच्या कुटुंबियांनी केली आहे. वैष्णवीच्या पालकांनी तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. 7 दिवसांपासून पोलिस राजेंद्र हगवणे आणि दिर सुशील यांचा शोध घेत होते. माहितीनुसार, एका हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना राजेंद्र हगवणे कुठे आहे याबद्दल माहिती मिळाली, व्हिडीओमध्ये आरोपी राजेंद्र आणि त्याचे काही मित्र हॉटेलमध्ये जेवताना दिसत आहेत.
या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे आणि पोलिसांनी वैष्णवीला न्याय मिळावा यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.


