Pune Crime : एका मनोरुग्ण तरुणाच्या जीवघेण्या पोरखेळामुळे सोमवारी रात्री निगडी-यमुनानगर परिसर हादरून गेला होता. चिकन चौक परिसरातील एका हाय-टेन्शन टॉवरवर हा तरुण रात्री 9:15 च्या सुमारास चढल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. तो टॉवरच्या अगदी टोकावर जाऊन जीवघेणी कसरत करत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावत अथक प्रयत्नांनंतर या तरुणाला सुरक्षितरीत्या खाली उतरवले.
ब्रांटो स्काय लिफ्ट आणि आव्हानात्मक बचावकार्य
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि टॉवरची उंची लक्षात घेता तातडीने 55 मीटर उंचीची ‘ब्रांटो स्काय लिफ्ट’ घटनास्थळी पाचारण करण्यात आली. बचावकार्य सुरू असताना या तरुणाने जवानांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. जवानांनी जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता, त्याने टॉवरचा अर्थिंग जॉइंट तोडून खाली फेकला, ज्यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता. या अडथळ्यांनंतरही जवानांनी हार मानली नाही आणि अतिशय कौशल्याने परिस्थिती हाताळली.
सुरक्षित सुटका आणि प्रशासनाचे आवाहन
अग्निशमन दलाच्या जवानांनी चहुबाजूंनी वेढा घालून एका बाजूने टॉवरवर चढून आणि दुसऱ्या बाजूने स्काय लिफ्टच्या मदतीने त्या तरुणाला कचाट्यात पकडले. यशस्वी रेस्क्यू ऑपरेशननंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या मोहिमेनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) अग्निशमन विभागाचे उप आयुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी प्रतिक्रिया दिली की, “अशा घटनांमध्ये बचावकार्य करणे हे जवानांसाठी मोठे आव्हान असते. नागरिकांनी अशा धोकादायक आणि प्रतिबंधित ठिकाणी जाणे टाळावे.”


