Washim Crime: वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तिवळी येथे घडलेल्या एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूच्या हृदयद्रावक घटनेला आता एक मोठे वेगळे वळण मिळाले आहे. पत्नी व दोन निष्पाप मुलांचा विहिरीत बुडवून खून केल्यानंतर पतीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी शिरपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कौटुंबिक छळ आणि जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले असून, मृत व्यक्तीच्या सख्ख्या भावासह त्याच्या कुटुंबातील एकूण चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालमत्तेचा वाद अन् मानसिक छळ ठरला कारणीभूत
या प्रकरणात मृत संतोष बकाल यांचे मेहुणे सुधाकर सुभाष इंगोले यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. या तक्रारीनुसार, संतोष यांच्या हक्काची शेतजमीन, मालमत्तेतील हिस्सा आणि आर्थिक व्यवहारांवरून बकाल कुटुंबामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र संघर्ष सुरू होता. या वादातून आरोपी संतोष यांना सतत मानसिक विवंचनेत टाकत असत. त्यांना जाहीरपणे अपमानित करणे, धमकावणे आणि मानसिक दबाव आणणे असे प्रकार सातत्याने घडत होते, ज्याला कंटाळून अखेर त्यांनी हे भीषण पाऊल उचलले.
मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 108 आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. यातील मुख्य संशयित महादेव बकाल याला पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या असून, फरार असलेल्या इतर तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
काय होती मूळ घटना?
हा संपूर्ण प्रकार 13 जून रोजी उघडकीस आला होता. तिवळी गावातील ३५ वर्षीय संतोष तुकाराम बकाल यांचा मृतदेह महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर शोध घेतला असता, त्यांची २८ वर्षीय पत्नी वर्षा उर्फ इंद्रायणी बकाल, ७ वर्षांची मुलगी जान्हवी आणि ५ वर्षांचा मुलगा सोहम या तिघांचे मृतदेह गावातीलच एका विहिरीतून बाहेर काढण्यात आले होते. या घटनेने संपूर्ण वाशिम जिल्हा हादरला होता.


