मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी (दि.२०) मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांना स्थान देण्यात आले. भुजबळ यांना पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खाते मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता याबाबत शासकीय आदेश काढण्यात आला असून मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सुरुवातीला छगन भुजबळ यांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु होती. तसेच मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकवेळा बोलून दाखवली होती. त्यांनी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख असलेल्या अजित पवारांवरही थेट टीका केली होती. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी त्यांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला होता.
महायुतीच्या गेल्या सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये हे खाते धनंजय मुंडे यांना देण्यात आले होते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या खात्याचा कार्यभार होता. आता पुन्हा एकदा अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी छगन भुजबळ यांना देण्यात आली आहे.
ताबडतोब खात्याचा चार्ज घेणार : छगन भुजबळ
याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला आत्ताच समजले आहे की, खात्याबाबत नोटिफिकेशन निघाले आहे. मी लगेच मुंबईला जात आहे. ताबडतोब विभागाचा चार्ज पण घेतो आहे. खात्याचे मुख्य अधिकारी, सचिव या सर्वांची बैठक देखील घेणार आहे. त्यांचे काय प्रश्न आहेत? यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.


