पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा २४ जून ते १६ जुलै या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा २४ जून ते ८ जुलै या कालावधीत घेतली जाणार आहे. इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेचा निकाल ५ मे रोजी, तर दहावीच्या लेखी परीक्षेचा निकाल १३ मे रोजी जाहीर झाला.
या परीक्षेतील अनुत्तीर्ण, एटीकेटी प्राप्त विद्यार्थी, श्रेणी सुधार करू इच्छिणारे विद्यार्थी यांना संधी मिळण्यासाठी पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. नियमित परीक्षेप्रमाणे पुरवणी परीक्षादेखील यंदा लवकर होत आहे. दरवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये घेतली जाणारी पुरवणी परीक्षा यंदा जूनमध्ये सुरू होत आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक https://www. mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले.


