पुणे: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत वारंवार अडथळे निर्माण होत असल्याने प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल करावा लागत आहेत. अकरावी प्रवेशासाठीच्या अधिकृत संकेतस्थळात तांत्रिक बिघाड झाल्याने आता अर्जनोंदणीला २६ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरुवात होत आहे. दरम्यान, सततच्या ‘तारीख पे तारीख मुळे अकरावीची प्रवेशप्रक्रिया रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
राज्यातील सर्व पात्र कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. मात्र, राज्यभरातील लाखो विद्यार्थी एकच वेळी ऑनलाईन अर्ज भरणार असल्याने त्यासाठी भक्कम तयारी करणे आवश्यक आहे. प्रवेशप्रक्रिया कशी राबवली जाईल, याबाबत शालेय शिक्षण विभागाने अध्यादेश प्रसिद्ध केला होता.
यापूर्वी १९ मेपासून सुरू होणारी अर्जनोंदणी २१ मेपासून सुरू झाली. परंतु, पहिल्याच दिवशी संकेतस्थळात तांत्रिक बिघाड झाल्याने अर्जनोंदणीची प्रक्रिया ठप्प झाली. संकेतस्थळातील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आता अर्जनोंदणीला २६ मेपासून सुरुवात होत आहे. सकाळी ११ वाजता प्रवेशप्रक्रिया सुरू होईल, असे संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले.


