मुळशी (पुणे) : पुण्यात पुन्हा एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून आईस्क्रीम विक्री करणाऱ्या एका व्यक्तीने १४ वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना मुळशी तालुक्यात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास आपल्या लहान चुलत बहिणीसोबत घराजवळ आलेल्या आईस्क्रीम विक्रेत्याकडे आईस्क्रीम घेण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी पिंटू शिवकुमार याने मुलीला आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने जवळ बोलावले आणि तिच्यावर अश्लील कृत्य करत विनयभंग केला.
घाबरलेल्या मुलीने तत्काळ आरडाओरडा करत घरी धाव घेतली आणि कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी आरोपीचा शोध घेत त्याला पकडले आणि पौड पोलिसांच्या ताब्यात दिले.
पौड पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध गुन्हा क्र. १२३/२०२६ नोंद केला आहे. त्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४ तसेच POCSO कायद्यांतर्गत कलम ८ व १२ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीची सध्या पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.


