Nagpur Police : नागपूर शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. सायबर पोलीस ठाण्यातील गंभीर गैरकारभार उघडकीस आल्यानंतर पोलीस निरीक्षकांसह तब्बल ९ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे संपूर्ण पोलीस दलात चर्चा रंगली आहे.
नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी ही कठोर कारवाई केली असून, सायबर शाखेतील गैरप्रकारांची गंभीर दखल घेतली आहे. निलंबनानंतर सायबर शाखेच्या पोलीस उपायुक्तपदाची जबाबदारी उपायुक्त दीपक अग्रवाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
कोणावर झाली कारवाई?
निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार (दक्षिण), योगेश घारे (उत्तर), सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्यासह ६ हवालदारांचा समावेश आहे. या यादीत सौरभ हिवरकर, श्रीकांत गणोकर, सुनील चनगोले, सतीश वाघ, अजय पवार आणि प्रफुल्ल ठाकरे यांची नावे आहेत.
दरम्यान, दक्षिण विभाग सायबर ठाण्याची जबाबदारी सुरेश डंभारे, तर उत्तर सायबर ठाण्याची जबाबदारी सुधीर बोरकुटे यांच्याकडे देण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तपासकामकाज बाजूला ठेवून परस्परांच्या कामात हस्तक्षेप करणे, सहकाऱ्यांमध्ये वाद आणि हाणामारीचे प्रकार घडल्याची माहिती समोर आली होती.
या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार प्रशासन विभागाचे उपायुक्त दीपक अग्रवाल यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले. चौकशीवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून संबंधित ९ जणांना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
२५० कोटींच्या व्यवहारातून उघड झाला वाद
हिरेन भोजवानी यांच्या तक्रारीनंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले. सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने पुण्यात छापा टाकून १४ जणांना ताब्यात घेतलं होतं. चौकशीत क्रिकेट सट्टेबाजीचं मोठं जाळं उघड झालं.
तपासादरम्यान ‘एकांश’ नावाच्या बुकीने ४० हून अधिक बँक खात्यांद्वारे तब्बल २५० कोटी रुपयांचे व्यवहार केल्याची माहिती समोर आली. मात्र एवढं गंभीर प्रकरण असतानाही संबंधिताला केवळ सूचनापत्र देऊन सोडून दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर तो फरार झाला.
हा प्रकार उघड होताच सायबर विभागातील दुसऱ्या गटातील अधिकाऱ्यांनी ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली आणि अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. या संपूर्ण प्रकरणामुळे नागपूर पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विभागीय चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


