पुणे : नवले पूल परिसरात गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू आणि ९-१० जण जखमी झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील या परिसरात वाहनांची वेगमर्यादा ६० किमी/तासवरून थेट ३० किमी/तास करण्यात आली आहे. ठिकठिकाणी स्पीडगन बसवून वेगमर्यादेचे काटेकोर पालन केले जाईल, तर नियमभंग करणाऱ्यांवर जागेवरच कारवाई होणार आहे.
पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी शासकीय विश्रामगृहात महत्त्वाची बैठक झाली. यात महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, PMRDA आयुक्त डॉ. योगेश म्हसे, ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, राज्य महामार्ग आणि RTO अधिकाऱ्यांनी भाग घेतला.
बैठकीत काय झाले निर्णय?
खेड शिवापूर टोलनाक्यावर अवजड वाहनांची (ट्रक, कंटेनर) कठोर तपासणी.
क्षमतेपेक्षा जास्त माल असल्यास जागेवरच माल उतरवला जाईल.
ब्रेक, तांत्रिक बाबींची तपासणी अनिवार्य.
दरी पूल ते वडगाव बुद्रुक दरम्यान भरधाव जड वाहनांवर तात्काळ दंडात्मक कारवाई.
स्वामिनारायण मंदिर ते नवले पूल दरम्यान तीव्र उतारावर रंबल स्ट्रिप्स बसवल्या.
सध्याचे ३ स्पीडगन वाढवले जातील.
दीर्घकालीन उपाय काय?
नऱ्हे ते रावेत उन्नत मार्ग आराखडा मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा.
जांभूळवाडी ते वारजे वर्तुळाकार मार्गाद्वारे वाहतूक वळवण्याची योजना.
भूसंपादन व अतिक्रमण दूर करून सेवा रस्ते पूर्ण करण्याचे आदेश.
पाषाण येथील संरक्षण विभागाची जागा सेवा रस्त्यासाठी मिळवण्यासाठी प्रयत्न.
सेवा रस्त्यावरील बेकायदा बस थांबे हटवले जातील; सुरक्षित थांबे बांधले जातील.
दररोज साडेतीनशे PMP बस फेऱ्या असल्याने अतिक्रमणांवर कडक कारवाई.
महिनाभरात अहवाल, डिसेंबरमध्ये आढावा
मोहोळ म्हणाले, “सर्व यंत्रणांवर जबाबदारी निश्चित केली आहे. महिनाभरात कामाचा अहवाल सादर करावा. डिसेंबरमध्ये पुन्हा बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेतला जाईल.”नवले पूल परिसर आता अपघातमुक्त क्षेत्र बनवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, वेगमर्यादा आणि ओव्हरलोडिंगवर कठोर नियंत्रण हे मुख्य हत्यार ठरणार आहे.


