सोलापूर: एखाद्या चित्रपटामधील कथानकाप्रमाणे उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नजला असं कथानक घडलंय. अगदी अंगावर – शहारे आणणारं… डोळ्यात अश्रू उभा राहणारं. वैजिनाथ गवळी हे या गावचे पुढारी. स्पष्टपणे बोलणं त्यांच्या स्वभावाचे खास वैशिष्टये. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांचे ते कट्टर समर्थक म्हणून देखील त्यांची संपूर्ण उत्तर सोलापूर तालुक्यात ओळख… वैजिनाथ आणि त्यांच्या सौभाग्यवती कांचना यांना प्रणिता ही एकुलती एक मुलगी. वैजिनाथ हे भावाच्या दोन्ही मुलांनाच आपली मुले म्हणून समजत होते.
आपल्या लेकीला चांगलं स्थळ मिळावं. तिचे एकदा का हात पिवळे झाले, ती माहेरी नांदायला गेली म्हणजे आपण जबाबदारीमधून थोडं मुक्त झालो. मग कधीही देवाचं बोलावणं आलं की डोळे मिटवायला तयार असे, वैजिनाथ गवळी नेहमीच मित्र परिवाराजवळ म्हणायचे. याच टप्यावर सारोळे (ता. बार्शी) येथील भैरवनाथ गाटे यांचे स्थळ प्रणितासाठी गवळी परिवाराने पसंद केले. मागच्या अनेक दिवसांपासून लग्नाची तयारी सुरु होती. एकूलत्या एक पोरीचं मोठं लग्न लावून द्यायचं म्हणून वैजिनाथ यांच्यासह आख्ख्या गवळी परिवारांची धडपड सुरु होती. मात्र, ही धडपड पर्यायाने पोरीचं लग्न वैजिनाथ यांना बघू द्यायचं नाही, असं नियतीच्या मनात असावं. त्यातूनच तिने जणू काही डाव साधला.
सारोळ्यात रविवारी (दि.२९) रात्री लाडक्या प्रणिताचा हळद लावण्याचा कार्यक्रम उरकल्यानंतर वैजिनाथ गवळी हे आपल्या बोलेरो स्कार्पिओ या गाडीतून लग्राच्या पुढच्या तयारीसाठी गावाकडे नान्नजला येत होते. या दरम्यान वाणेवाडी ते गावडी दारफळ या मार्गावर रात्री साडे दहा वाजता त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे प्रमोद आणि विजय हे दोघेही होते. त्यांनी गाडी तशीच पुढे सोलापुरातील भैया चौक परिसरातील एका दवाखान्यामध्ये आणली. उपचार सुरु करण्यासाठी डॉक्टरांनी तयारी केली. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झालेला होता. उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
नवरा-नवरी दोघेही उच्चशिक्षीत, सधन घराण्यातील इंजिनिअर
प्रणिता या बीई कॉम्प्युटर सायन्स पदवीधारक आहेत. पुण्यात त्या एका मोठ्या कंपनीत नोकरीला आहेत. तर त्यांचे मिस्टर भैरवानाथ गाटे हे बीई कॉम्प्युटर आणि एलएलबी पदवीधारक असून ते मुंबईला मोठ्या पदावर नोकरीला आहेत.
सगळं गाव हळहळतंय; चुली पेटल्या नाहीत
वैजिनाथ गवळी हे नान्नज गावचे प्रमुख पुढारी होते. या गावात त्यांच्या शब्दाला खूप किंमत आणि मान होता. त्यांच्या एकुलत्या एक पोरीच्या लग्नापूर्वीच काही तास त्यांचा मृत्यू व्हावा, याबद्दल सगळे गावं अक्षरशः हळहळ करतंय. गवळी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळल्यानं या गावात रविवारी चुली पेटल्या नाहीत. पोरीचं लग्न बिचाऱ्या बापाली पाहता आलं नाही, याबद्दल संपूर्ण गाव हळहळतंय.
लग्नाच्या वऱ्हाडाला यावं लागलं अंत्यसंस्कारला
वैरागमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न उरकल्यानंतर पाहुणे-रावळे आणि नवरी प्रणिता आणि नवरदेव भैरवानाथ हे सगळे नान्नजला वैजिनाथ गवळी यांच्या अंत्यसंस्कारला आले. वास्तविक प्रणिताच्या लग्नासाठी सर्वांना वैरागला जायचे होते. मात्र त्या सर्वांना अत्यंसंस्कारासाठी नान्नजला यावे लागले. दुपारी साधारण एक वाजण्याच्या सुमारास अत्यसंस्कार झाले
मामा-काका यांनी केलं प्रणिताचं कन्यादान
प्रणिता आणि भैरवानाथ यांच्या अंगाला हळद लागली आहे. तेव्हा लग्न रद्द करु नये, हा प्रस्ताव दोन्ही परिवाराच्या सुज्ञ लोकांकडून आला. त्यावर वैराग इथं सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अत्यंत दुःखाच्या सावटात प्रणिता आणि भैरवानाथ यांच्या डोक्यावर अक्षता टाकण्यात आल्या. कोल्हापूरचे मामा उदयसिंह पाटील यांनी प्रणिता हिचे कन्यादान केले, यावेळी नातेवाईकांमधील काका वगैरे जवळची मंडळी उपस्थित होती.


