पाटणा: बिहारमध्ये राजद सुप्रीमो लालू यादव यांच्या कुटुंबात सध्या भूकंप सुरू आहे. लालूंचा मोठा मुलगा तेज प्रताप याची एक फेसबुक पोस्ट कुटुंबासाठी अडचणीची ठरत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी लालू प्रसाद यादव स्वतः मैदानात उतरले आहेत. त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. यानंतर आता तेज प्रताप यांची पत्नी ऐश्वर्या राय देखील या प्रकरणात पुढे आली आहे. ऐश्वर्या राय या त्यांचे पती तेज प्रतापपासून वेगळ्या राहत आहेत. राय म्हणाले की, लालू यादव यांचे संपूर्ण कुटुंब अभिनय करत आहे. संपूर्ण कुटुंब एकत्र आहे. या लोकांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले.
तेज प्रताप यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. ज्यामध्ये त्यांनी अनुष्का यादव नावाच्या महिलेसोबतच्या त्यांच्या १२ वर्षांच्या नात्याबद्दल सांगितले. या पोस्टनंतर, आरजेडीने तेज प्रताप यांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले. ऐश्वर्या म्हणतात की, जेव्हा तेज प्रताप आधीच दुसऱ्या कोणाच्या प्रेमात होते, तर त्यांनी त्यांच्याशी लग्न का केले? आणि त्यांचे आयुष्य का उद्ध्वस्त केले?
माध्यमांशी बोलताना राय म्हणाल्या की, या लोकांनी सर्व काही माझ्यावर लादले. मुलीची प्रतिष्ठा खराब करणे खूप सोपे आहे. ऐश्वर्या यांनी या संपूर्ण प्रकरणाला नाटक म्हटले आहे. हे सर्व लोक यामध्ये सामील आहेत. मुलाला पक्षातून काढून टाकणे हे फक्त एक नाटक आहे. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की, जेव्हा त्यांना सगळं माहित होतं, मग त्यांनी माझं लग्न का लावलं? माझे आयुष्य का उद्ध्वस्त केले? त्यांनी राबडी देवींवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.


