नवी दिल्ली: आजच्या घडीला केरळमध्ये मान्सून दाखल होत असला, तरी उद्यापासून पुढील ९ दिवस देशभरात तीव्र उष्णता राहणार आहे. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या ९ दिवसांमध्ये दिवसांसाठी नवतपाला सुरुवात होते, ज्यामध्ये सूर्याची उष्णता शिगेला पोहोचते. या वर्षी हे ९ दिवस उद्यापासून (दि . २५) सुरू होत आहेत आणि ८ जून रोजी संपतील. या काळात देशभरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
नवतपा म्हणजे काय?
हिंदू धर्मात नवतपाला विशेष महत्त्व आहे. हे उन्हाळ्यातील नऊ दिवस असतात, जेव्हा पृथ्वी सूर्याच्या अगदी जवळ असते. या कारणाने या नऊ दिवसांमध्ये वर्षातून सर्वात जास्त उन्हाचा पारा वाढतो. असं म्हणतात जर नवतपामध्ये चांगले ऊन तापले, तर पाऊस देखील चांगला पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र देवाचे रोहिणी नक्षत्रावर वर्चस्व असते म्हणजे स्वामी ग्रह असतो. त्यामुळे या नक्षत्रामध्ये सूर्याचा प्रवेश झाल्याने चंद्राची शीतलता कमी होते, ज्यामुळे उन्हाचा पारा वाढतो. पृथ्वीपासून जवळ असल्याने सूर्याची किरणे पृथ्वीवर थेट पडतात. ज्यामुळे झाडे झुडपे वाळतात.
नवतपा दरम्यान काय करावे आणि काय करू नये:
काय करावे:
- शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी जास्त पाणी प्या.
- हलके आणि थंड अन्न खा.
- उन्हात बाहेर पडताना डोके झाकून घ्या आणि सनस्क्रीन वापरा.
- सुती आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घाला.
काय करू नये:
- जास्त वेळ उन्हात राहू नका.
- जास्त तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळा.
- शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका.
राजस्थानमध्ये रेड अलर्ट
नवतपा सुरू होण्यापूर्वीच, हवामान खात्याने उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये तीव्र उष्णतेसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. आयएमडीचे शास्त्रज्ञ नरेश कुमार म्हणाले की, वायव्य भारतात अजूनही उष्णतेच्या लाटेची परिस्थिती कायम आहे. पुढील तीन दिवस राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत रेड अलर्ट राहील. पुढील ३-४ दिवस पंजाब आणि हरियाणामध्ये उष्णतेची लाट राहील. आज आणि उद्या दिल्ली एनसीआरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. आज, काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ४०-५० किमी प्रतितास पर्यंत पोहोचू शकतो आणि उद्या ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, ज्यासाठी दिल्ली एनसीआरसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
शुक्रवारी राजस्थानमध्ये उष्णतेची लाट कायम राहिली, कारण सीमावर्ती जैसलमेर जिल्ह्यात कमाल तापमान ४८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, राज्यात तीव्र उष्णता कायम राहील. राजस्थान, विशेषतः त्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून तीव्र उष्णता जाणवत आहे आणि हा प्रदेश ‘उष्णतेच्या लाटे’च्या विळख्यात सापडला आहे. आयएमडीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस पश्चिम राजस्थानातील जोधपूर, बिकानेर विभाग आणि शेखावाटी प्रदेशातील काही भागात उष्ण रात्री राहण्याची दाट शक्यता आहे.


