मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आता या भेटीसंदर्भात एक माहिती समोर येत आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधानपरिषदेवर पाठवले जाऊ शकते. भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या एकूण 12 जागांपैकी 5 जागा रिक्त आहेत.
मुंबईसह इतर ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप मनसेची साथ घेणार असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे भाजप काही जागा मनसेला सोडू शकते. अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर संधी देऊन भाजप आणि मनसेच्या मैत्रीचा नवा अंक सुरु होणार का? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महेश सावंत यांनी सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांचा पराभव केला होता.
सध्या राज्यपाल नामनिर्देशित कोट्यातून भारतीय जनता पक्षाच्या चित्रा वाघ, विक्रांत पाटील, बाबूसिंग महाराज राठोड, शिवसेनेचे हेमंत पाटील, मनीषा कायंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भुजबळ, इद्रिस नायकवडी विधानपरिषदेवर आमदार आहेत. 12 पैकी 5 जागा अजूनही रिक्त असून या जागेवर महायुतीकडून कोणाला संधी मिळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


