मुंबई: युतीसाठी अट घालणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपुढे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (मनसे) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबतची आघाडी तोडा अशी अट घातल्याचे समजते. यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामध्ये अटी आणि शर्थींचा अडथळा ठरत असल्याची चर्चा आहे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या हितासाठी मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीतील घटक पक्षांसोबतचे सर्व संबंध तोडा, अशी अट घालत लगेच याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. यानंतर दोन्ही पक्षांतील संभाव्य युतीत सुरुवातीलाच स्पीडब्रेकर आला. सध्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. मात्र, आता मनसेकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी शिवसेना (ठाकरे) पक्षाची असलेली आघाडी तोडण्याबाबत अट घातल्याचे समजते. त्यामुळे उद्धव ठाकरे मनसेची ही अट मान्य करणार का? हे पाहावे लागणार आहे.
महापालिकेचे जागावाटपही कळीचा मुद्दा
ठाकरे बंधूंच्या युतीसाठी अटी-शर्थींसोबत आता महापालिकेचे जागा वाटपसुद्धा कळीचा मुद्दा असणार आहे. मनसे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षामध्ये मुंबई, ठाणे, नाशिक शहरात राजकीय स्पर्धा आहे. ही युती होताना मनसेचा मुंबईतील काही महत्वाच्या जागांवर दावा राहणार आहे. तर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे या जागांवरील वर्चस्व कायम ठेवण्याचे प्रयत्न राहणार आहेत.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, नेते मात्र पुढाकार घेईनात
सध्याच्या परिस्थितीत मनसे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये युतीबाबत असलेला उत्साह स्पष्ट दिसत आहे. युतीच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मानसिक तयारीही केल्याचे दिसत आहे. परंतु वरिष्ठ नेते मात्र स्वतः हुन पुढाकार घेण्यास तयार नाहीत, दोन्ही पक्षांकडून पहिले आप, पहिले आप असे सुरू आहे. याशिवाय ठाकरे बंधूनी घातलेल्या अटी व शर्थी, महापालिका निवडणुकीतील जागावाटप, राजकीय विश्वासाचा अभाव हेदेखील या दोन्ही पक्षांतील संभाव्य युतीच्या मार्गात अडथळे ठरत आहेत.
….. तर कुणाच्या हाताची गरज राहणार नाही- सुषमा अंधारे
मनसे-शिवसेना (ठाकरे) पक्षाची युती होऊन दोन ठाकरे बंधूचे हात एकमेकांच्या हातात आले तर या दोघा भावांना इतर कोणाचे हात हातात घेण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे मनसे प्रमुखांनी जर भाजप आणि शिंदेंचा हात सोडला तर शिवसेना (ठाकरे) पक्षालाही कुणाशी हस्तांदोलन करण्याची गरज पडणार नाही, महाराष्ट्रासाठी ठाकरे ब्रँड पुरेसा आहे, अशी प्रतिक्रिया देत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे सोबतच्या युतीसाठी काँग्रेसची साथ सोडण्यास तयार असल्याचे संकेत दिले.


