BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आता केवळ 48 तास शिल्लक असताना, महायुतीमधील अंतर्गत संघर्षाने टोक गाठले आहे. एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच जवळच्या नातेवाईकाने राजकीय धक्का दिला आहे. शिंदेंचे भाचे आशिष माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारीही पदरात पाडून घेतली आहे. या ‘दोस्तीत कुस्ती’मुळे महायुतीमधील तिन्ही पक्षांतील वितुष्ट चव्हाट्यावर आले आहे.
शिंदेंचा भाचा आणि भाजपची नेत्या राष्ट्रवादीच्या गोटात
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबईत ‘आयाराम-गयारामांच्या’ माध्यमातून मित्रपक्षांचीच कोंडी केली आहे. एकनाथ शिंदे यांचे भाचे आशिष माने यांनी मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना चांदिवली मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 159 मधून मैदानात उतरवण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादीने केवळ शिंदेंनाच नाही तर भाजपलाही धक्का दिला आहे. भाजपच्या माजी महामंत्री नेहा राठोड यांना राष्ट्रवादीने प्रभाग क्रमांक 156 मधून उमेदवारी जाहीर केली आहे.
नवाब मलिकांचा ‘फॅक्टर’ आणि युतीचे त्रांगडे
मुंबईत महायुतीचा जागावाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने 20 ते 25 जागांची मागणी लावून धरली आहे. मात्र, नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने निवडणूक लढवल्यास त्यांना युतीत घेण्यास भाजपचा तीव्र विरोध आहे. या पेचामुळे सध्या तरी शिंदेसेना आणि भाजप एकत्र दिसत असले, तरी राष्ट्रवादीने मित्रपक्षांचे उमेदवार फोडून आपली स्वतंत्र ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.
पुढचे 24 तास निर्णायक
निवडणुकीच्या रिंगणात कोण कोणाविरुद्ध लढणार आणि महायुतीचे अधिकृत जागावाटप काय असेल, याचे चित्र पुढील 24 तासांत स्पष्ट होईल. राष्ट्रवादीच्या या आक्रमक पवित्र्यामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या रणनीतीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


