Pune MHADA Lottery: हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आचारसंहितेमुळे रखडलेली पुणे म्हाडा (MHADA Pune) घरांची सोडत आता लवकरच जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्याने या प्रक्रियेला वेग आला असून, येत्या काही दिवसांत निकालाची घोषणा होऊ शकते.
आचारसंहितेचा अडथळा दूर होणार?
पुणे मंडळाच्या 4,186 घरांसाठीची अर्ज प्रक्रिया सप्टेंबर महिन्यापासूनच पूर्ण झाली आहे. मात्र, राज्यात लागू असलेल्या आचारसंहितेमुळे घरांचा ‘लकी ड्रॉ’ घेण्यास प्रशासकीय अडचणी येत होत्या. ही कोंडी फोडण्यासाठी आढळराव पाटील यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. ही सोडत केवळ एक तांत्रिक प्रक्रिया असून यात कोणताही नवीन धोरणात्मक निर्णय घेतला जाणार नाही, असे त्यांनी आयोगाला पटवून दिले आहे.
एका आठवड्यात सोडत काढण्याची तयारी
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने या प्रस्तावावर सकारात्मकता दर्शवली आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. आयोगाची अधिकृत परवानगी मिळताच अवघ्या एका आठवड्याच्या आत घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन म्हाडा प्रशासनाने केले आहे.
सर्वसामान्यांना व्याजाच्या फटक्यातून सुटका
सप्टेंबरपासून हजारो अर्जदारांची अनामत रक्कम (EMD) म्हाडाकडे जमा आहे. ही रक्कम भरण्यासाठी अनेकांनी कर्ज काढले आहे किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला आहे. निकाल लांबल्याने या सर्वसामान्यांवर व्याजाचा मोठा बोजा पडत होता. निकाल लावा किंवा आमच्या पैशांचे व्याज द्या, अशी संतप्त मागणी सोशल मीडियावर केली जात होती. आता सोडत जाहीर झाल्यास अपात्र अर्जदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.


