Devendra Fadnavis: देशाच्या राजकीय पटलावर शुक्रवारी एक अभूतपूर्व आणि धक्कादायक घटना घडली. संसदेत मांडलेले ‘नारी शक्ती वंदन’ (१३१ वी घटनादुरुस्ती) विधेयक पुरेशा बहुमताअभावी कोसळले. या निकालाने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून विरोधकांना थेट धारेवर धरले आहे. “७० कोटी महिलांच्या विश्वासाला तडा देत विरोधकांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे,” अशा जळजळीत शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
मोदी सरकारला संसदेत पहिलाच मोठा अडथळा
लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के प्रतिनिधित्व देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने हे ऐतिहासिक पाऊल उचलले होते. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मांडलेले हे विधेयक दोन तृतीयांश बहुमत मिळवण्यात अपयशी ठरले. विशेष म्हणजे, नरेंद्र मोदींच्या प्रदीर्घ कार्यकाळात संसदेत फेटाळले गेलेले हे पहिलेच महत्त्वपूर्ण विधेयक ठरल्याने सत्ताधारी भाजपमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.
फडणवीसांचा हल्लाबोल: “ही तर राजकीय भ्रूणहत्या”
विधेयक नामंजूर झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी विरोधकांवर टीकेचे आसूड ओढले. त्यांनी म्हटलं की, “महात्मा ज्योतिबा फुलेंच्या स्त्री-शिक्षणाच्या आणि सक्षमीकरणाच्या विचारांना विरोधकांनी तिलांजली दिली आहे. त्यांची ही कृती महिलाविरोधी मानसिकतेचा पुरावा आहे,” असे फडणवीस म्हणाले. विरोधकांनी ऐनवेळी आपली भूमिका बदलल्याचा आरोप करत त्यांनी विरोधकांची तुलना ‘रंग बदलणाऱ्या सरड्यांशी’ केली. हे विधेयक पाडण्यासाठी विरोधक पूर्ण तयारीनेच आले होते, असा दावाही त्यांनी केला. या विधेयकामुळे दक्षिण भारतावर अन्याय होईल, हा विरोधकांचा दावा फेटाळताना फडणवीस म्हणाले की, “मोदी सरकारने उत्तर-दक्षिण असा भेदभाव कधीच केला नाही. उलट दक्षिणेकडील राज्यांचे हित जपण्यासाठी या विधेयकात विशेष तरतूद होती. मात्र, केवळ राजकीय द्वेषापोटी महिलांच्या हक्कांची ‘भ्रूणहत्या’ करण्यात आली आहे.”
आगामी संघर्षाचे संकेत
संसदेतील गोंधळावर भाष्य करताना फडणवीसांनी “तिथे बसलेल्यांची अक्कल कमी असेल तर देशाचे भवितव्य कठीण आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला. संसदेत हे विधेयक जरी पडले असले, तरी आता हा मुद्दा जनसामान्यांच्या न्यायालयात नेण्याचा निर्धार भाजपने केला आहे. आगामी निवडणुकांमध्ये ‘महिला आरक्षण’ हा कळीचा मुद्दा ठरण्याची चिन्हे असून, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष आता अधिक तीव्र होणार आहे.


