IMD Weather Alert : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून उष्णतेनंतर आता मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा मोठा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते, तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या वर नोंदवले गेले. या पार्श्वभूमीवर आता पावसासह गारपिटीचा अंदाज व्यक्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा मोठे संकट उभे ठाकले आहे.
मध्य महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांसह काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्येही गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टी भागातही जोरदार पावसाची शक्यता असून, यामुळे आधीच नुकसान झालेल्या पिकांवर पुन्हा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, इंदापूर तालुक्यातील काही भागांत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. कांदलगाव, सरडेवाडी, शहा हिंगणगाव आणि उजनी पट्ट्यात रात्रीपासून पाऊस सुरू असून शेतपिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
तसेच अक्कलकोट तालुक्यात बोरेगाव, हन्नूर, दर्शनाळ या गावांमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला आहे. अवकाळी पावसामुळे काढून ठेवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे.
सतत बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.


