Maharashtra Politics : कल्याण येथे काँग्रेस पक्षाच्या बैठकीदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पक्षाच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्ष राजा पातकर यांना भर बैठकीत कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला, ज्यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कल्याण पूर्व भागातील काँग्रेसच्या बैठकीत घडली. बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नाश्त्याच्या व्यवस्थेवरून चर्चा सुरू असताना एका कार्यकर्त्याने कुलकर्णी यांना पातकर यांनी त्यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचे सांगितले. यामुळे संतापलेल्या कुलकर्णी यांनी पातकर यांना सर्वांसमोर थप्पड मारल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर बैठकीत मोठा गोंधळ उडाला असून उपस्थित कार्यकर्तेही आश्चर्यचकित झाले. दरम्यान, महिला नगरसेविकेबाबत अपमानास्पद भाषा वापरणे चुकीचे असल्याचा दावा कुलकर्णी समर्थकांकडून केला जात आहे.
या प्रकारामुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून कल्याणमधील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेणार आणि संबंधितांवर कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


