नवी दिल्ली : मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवर एक नवीन फीचर येत आहे. यामुळे युजर्संना अशा कॉन्टॅक्ट्सचा रिकामा प्रोफाइल पिक्चर बदलता येईल, ज्यांनी आपला डीपी काढून टाकला आहे. या फीचर्समुळे युजर्स अशा प्रत्येक कॉन्टॅक्टसाठी आपल्या आवडीचा प्रोफाइल पिक्चर सेट करू शकतील. यामुळे समान नावे असलेल्या वापरकर्त्यांना ओळखणे सोपे होईल आणि चॅट दरम्यान मेसेज दुसऱ्या युजर्संना जाण्याचा धोका टळेल.
जेव्हा युजर्संने प्रोफाइल पिक्चर सेट केलेला नसेल, तेव्हाही हे व्हॉट्सॲप फीचर उपयुक्त ठरेल. रिपोर्ट्सनुसार, मेटाच्या मालकीचे व्हॉट्सॲप सध्या एका नवीन फीचरवर काम करत आहे. सुरुवातीला, हे फीचर निवडक युजर्संसाठी आणले जाईल, ज्यामुळे त्यांना त्यांच्या फोनमध्ये सेव्ह केलेल्या कॉन्टॅक्ट्सचा रिकामा प्रोफाइल पिक्चर बदलता येईल. वापरकर्ते त्यांच्या फोनच्या ॲड्रेस बुकमध्ये सेव्ह केलेल्या कॉन्टॅक्ट कार्डचा फोटो व्हॉट्सॲपवर सेट करू शकतील.
दरम्यान, हा बदल फक्त याच युजर्संपुरता मर्यादित असेल. याचा अर्थ असा की, इतर व्हॉट्सॲप युजर्सं ही इमेज पाहू शकणार नाहीत. यामुळे कॉन्टॅक्ट्सना ओळखणे सोपे होईल. सध्या, हे फीचर काही बीटा युजर्संसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.


