नवी दिल्ली : आपल्यापैकी अनेकजण लॅपटॉप वापरत असतील. लॅपटॉप चार्ज करणे हे एक सोपे काम वाटू शकते. मात्र, अगदी लहान निष्काळजीपणामुळेही तुमच्या डिव्हाइसचे नुकसान होऊ शकते. चुकीच्या पद्धतीच्या चार्जिंगमुळे बॅटरी लवकर खराब होऊ शकते आणि काहीवेळा सुरक्षेचा धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, काही सवयी लवकर बदलणे महत्त्वाचे आहे.
काही लोक अनेकदा लॅपटॉप चार्ज करत असताना गेम्स खेळतात किंवा व्हिडिओ एडिटिंगसारखी हेवी कामे करतात. यामुळे प्रोसेसर आणि बॅटरी या दोन्हींवर खूप ताण येतो आणि डिव्हाइस लवकर जास्त गरम होते. सिस्टीमवरील अनावश्यक ताण टाळण्यासाठी चार्जिंग करताना हलके काम करणे किंवा लॅपटॉपला विश्रांती देणे उत्तम ठरते. लॅपटॉप पलंग, उशी किंवा सोफ्यावर चार्ज करणे ही एक सामान्य चूक आहे. यामुळे लॅपटॉपचे व्हेंट्स (हवा बाहेर काढण्याची छिद्रे) बंद होतात आणि हिट बाहेर पडण्यास अडथळा येतो. या वारंवार वापरामुळे मदरबोर्डसारख्या महत्त्वाच्या अंतर्गत घटकांचे नुकसान होऊ शकते. लॅपटॉप नेहमी कठीण, सपाट पृष्ठभागावर ठेवा.
तुमचे डिव्हाइस रात्रभर चार्जिंगला लावू नका. आधुनिक लॅपटॉपमध्ये ओव्हरचार्जिंगपासून संरक्षण (ओव्हरचार्जिंग प्रोटेक्शन) असते, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते रात्रभर चार्जिंगला लावून ठेवावे. सतत १००% चार्जिंग केल्याने बॅटरीची क्षमता हळूहळू कमी होते. बॅटरी ८०-९०% झाल्यावर चार्जर काढून टाकण्याचा प्रयत्न करा.
स्वस्त किंवा फेक चार्जर वापरणे टाळा
पैसे वाचवण्याच्या प्रयत्नात, बरेच लोक स्वस्त किंवा नॉन ब्रँडचे चार्जर वापरतात. हे चार्जर योग्य व्होल्टेज आणि करंट पुरवत नाहीत, ज्यामुळे लॅपटॉपची बॅटरी किंवा इतर घटकांचे नुकसान होऊ शकते. नेहमी मूळ (ओरिजिनल) किंवा प्रमाणित (सर्टिफाइड) चार्जर वापरा.


