जोधपूर : राजस्थानातील फलोदी जिल्ह्यातील मतोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतामाला एक्स्प्रेस वे वर भीषण दुर्घटना घडली. या भीषण अपघातात जोधपूरच्या सुरसागर येथील 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहेत. भाविक बिकानेर येथील कोलायत मंदिराचं दर्शन घेऊन टेम्पो ट्रॅव्हलरमधून परतले होते. हनुमान सागर भागात वेगवान टेम्पो ट्रॅव्हलरनं रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या घटनेत 15 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
फलोदीचे पोलीस अधीक्षक कुंदन कंवरिया यांनी या भीषण अपघातातील मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे तर, 3 जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून ग्रीन कॉरिडॉर करुन जखमींना जोधपूरला पाठवण्यात आलं. फलोदीचे डीएसपी अचलसिंह देवडा यांनी म्हटलं अपघात इतका भीषण होता की टेम्पो ट्रॅव्हलरचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
स्थानिकांना आणि पोलिसांना टेम्पो ट्रॅव्हलरमधील मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. ट्रॅव्हलरमधील सीट आणि लोखंडात मृतदेह अडकले होते. फलोदीचे पोलीस स्टेशनचे अधिकारी अमानाराम यांनी सर्व मृत्यू झालेले भाविक जोधपूरच्या सूरसागर क्षेत्रातील होते, असं सांगितलं. ते कोलायतचं दर्शन करुन परत येत होते.
जोधपूर पोलीस आयुक्त ओमप्रकाश माथूर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अपघाताची माहिती घेतली. भारतमाला एक्स्प्रेस वेवर टेम्पो ट्रॅव्हलर वेगात होती. दृश्यमानता कमी असल्यानं चालकाला रस्त्याच्या कडेला पार्क केलेला ट्रक दिसला नाही हे अपघाताचं प्रमुख कारण मानलं जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या रस्ते अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी फलोदी मतोडा भागात झालेला अपघात दु:खद आहे. या घटनेतील मृतांच्या कुटुंबाप्रती संवेदना असल्याचं भजनलाल शर्मा म्हणाले.
माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी देखील या घटनेबद्दल शोक व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की मला पाटणा येथे फलोदीच्या मतोडा येथील रस्ते अपघातात 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. या अपघातामध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला परमेश्वरानं या संकटातून बाहेर पडण्याची हिंमत द्यावी, असं अशोक गहलोत म्हणाले.


