मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय पटावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक रचना मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन प्रवक्त्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. ही पावले पक्षाच्या विकासाभिमुख विचारधारेचा प्रसार करण्यासाठी आणि जनतेच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
पक्षाकडून नव्याने जाहीर करण्यात आलेल्या प्रवक्त्यांच्या यादीमध्ये अनिल पाटील, चेतन तुपे, सना मलिक, हेमलता पाटील, राजीव साबळे, सायली दळवी यांना स्थान देण्यात आले आहेत. रुपाली चाकणकर, आनंद परांजपे, राजलक्ष्मी भोसले, प्रतिभा शिंदे, प्रशांत पवार, शशिकांत तरंगे, ब्रिजमहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, सूरज चव्हाण, विकास पासलकर, श्याम सनेर यांचा देखील प्रवक्त्यांच्या यादीमध्ये समावेश आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन प्रवक्त्यांच्या यादीमध्ये रुपाली ठोंबर, तसेच अमोल मिटकरी यांना प्रवक्तेपदाची पुन्हा संधी देण्यात आली नाही. त्यांचे देखील नाव या नवीन यादीमध्ये नाही.
ही नियुक्ती पक्षाच्या सशक्त संघटनात्मक रचनेत एक महत्त्वाचा टप्पा आहे. राज्यभरात एनसीपीची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नवनियुक्त प्रवक्ते पक्षाच्या धोरणांचा प्रसार करतील आणि जनतेच्या समस्या प्रभावीपणे मांडतील. अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखालील एनसीपी ही आता महायुतीचा भाग असून, स्थानिक निवडणुकांत पक्षाने स्वतंत्र ओळख निर्माण करण्यावर भर दिला आहे. या नियुक्त्या स्थानिक पातळीवर पक्षाला मजबूत करणाऱ्या असून, विरोधकांच्या टीकेला तोंड देण्यासाठीही उपयुक्त ठरतील.


