नवी दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवणारी घटना दिल्लीमध्ये घडली असून लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्लीत स्फोटानंतर मुंबईला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुप्तचर विभागाचे प्रमुख (IB) आणि दिल्ली पोलीस आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली. त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अमित शाहांची चर्चा केल्याची माहिती आहे.
नवी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात असलेल्या मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ हा स्फोट झाला. या ठिकाणच्या पार्किमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये सायंकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी हा स्फोट झाला. त्यानंतर हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला असून दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अमित शाहांचा फोन
दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी गुप्तचर खात्याच्या प्रमुखांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आणि या स्फोटाची माहिती घेतली. घटनास्थळी एनएसजीचे अधिकारीही उपस्थित आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम पोहोचली असून त्यांनी पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली आहे.
लाल किल्ला टार्गेट?
हा स्फोट लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झाला. हे मेट्रो स्टेशन लाल किल्ल्यापासून फक्त 500 मीटर अंतरावर असल्याची माहिती आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये दिल्लीमध्ये असे लहान-लहान स्फोट झाले असून ते सर्व लाल किल्ला परिसरात झाल्याची माहिती आहे.
लाल किल्ला ही देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची वास्तू असून त्या ठिकाणाहून 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण देतात. त्यामुळे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर लाल किल्ला नेहमीच राहिल्याचं दिसतंय. आताही तसाच संदेश देण्यात आला आहे का याचा तपास केला जात आहे.
मॉक ड्रीलदरम्यान काही अधिकारी निलंबित
लाल किल्ला परिसराचं महत्त्व लक्षात घेता या ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी एक मॉक ड्रील करण्यात आला होता. त्यामध्ये काही अधिकारी संशयित वस्तू शोधण्यात अयशस्वी झाले होते. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.


