Jammu-Kashmir Blast : दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमध्येही दहशत माजली आहे. शुक्रवारी रात्री दक्षिण श्रीनगरमधील नौगाम पोलिस स्टेशनमध्ये साडेअकरा वाजता भयंकर स्फोट झाला. या स्फोटाने परिसर दणाणला आणि पोलिस ठाण्यातील २ अधिकाऱ्यांसह एकूण ९ जणांचा मृत्यू झाला. तर ३० जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
स्फोट इतका प्रचंड होता की पोलिस ठाण्याच्या इमारतीचा मोठा भाग कोसळला, आसपासची वाहने पेटली आणि मृतदेहांचे तुकडे विखुरले गेले. पोलिसांच्या माहितीनुसार, रात्री ११:२२ वाजता हा स्फोट झाला असून याचे धक्के किलोमीटरपर्यंत जाणवले. स्फोटानंतर छोटे-छोटे स्फोट सुरू असल्याने बचाव पथकाला आत प्रवेश करण्यास एक तास लागला. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आगीचे आणि धुराचे लोट दिसत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोटाने नागरिकांमध्ये घबराट पसरला. परिसर सील करण्यात आला असून, पोलिसांकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींवर उपचार सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.


