नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) युवा नेते अमित ठाकरे यांच्यावर राजकीय कारकिर्दीतील पहिला गुन्हा दाखल झाला आहे. नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य सिंहासनारूढ पुतळ्याचे बिनपरवानगी लोकार्पण केल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह ७० मनसैनिकांवर नेरुळ पोलिसांनी जमावबंदी उल्लंघन आणि नुकसान केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नेरुळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ हा पुतळा गेल्या चार महिन्यांपासून फाटलेल्या, घाणेरड्या कापडाने झाकून अनावरणाच्या प्रतीक्षेत होता. नवी मुंबईत पक्षाच्या शाखा उद्घाटन कार्यक्रमासाठी आलेल्या अमित ठाकरेंनी रीतसर परवानगी न घेता पुतळ्याचे लोकार्पण केले. यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल होण्याची शक्यता ओळखूनच अमित ठाकरेंनी आधीच सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी म्हटले होते, “महाराष्ट्रात, शिवछत्रपतींच्या भूमीत… महाराजांचा हा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही. आज नवी मुंबईत शाखा उद्घाटनासाठी गेलो होतो. त्यावेळी समजलं की तब्बल चार महिने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा फक्त लोकार्पणासाठी नेता मिळत नसल्याने घाणेरड्या, फाटलेल्या कापडाने झाकून ठेवलाय.
या चार महिन्यांत विमानतळासाठी, दहीहंडी, दिवाळी, दसरा…सगळ्या कार्यक्रमांना नेते पोहोचल्याचे दिसले.”ते पुढे म्हणाले, “स्वराज्याचे संस्थापक, आपल्या आराध्य दैवत असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करायला त्यांना एक तासही मिळाला नाही का? निवडणुकांच्या वेळी महाराजांचा जयजयकार करणारे, भाषणातून महाराजांच्या नावावर टाळ्या घेणाऱ्यांना पुतळ्याचे लोकार्पण करायला वेळ नाही? हे महाराष्ट्रात घडतंय, हेच लाजिरवाणं आहे!”
या प्रकरणावर भाष्य करताना अमित ठाकरेंनी गुन्हा दाखल होण्याची पूर्वकल्पना असल्याचे सांगितले आणि म्हणाले, “या कार्यासाठी झालेला हा माझ्यावरील पहिला गुन्हा असेल आणि त्याचा मला आनंदच असेल!” मनसे कार्यकर्त्यांमध्ये या कारवाईमुळे संतापाची लाट उसळली असून, पुढील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे.


