सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडू लागला असून सावंतवाडी नगरपरिषदेची रणधुमाळी विशेषत: रंगतदार ठरत आहे. भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात उतरवत असल्याने मतदारांसमोर वेगवेगळ्या हुकमी पटांचा खेळ उभा राहिली आहे. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर स्वतः प्रचारात उतरले असताना, दुसरीकडे राजघराण्याच्या वारशाने नटलेल्या श्रद्धा सावंत भोसले यांनी भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल करून स्पर्धा चुरशीची केली आहे.
याचदरम्यान, श्रद्धा सावंत भोसले यांचा माध्यमांना दिलेला मुलाखतीचा एक व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला. मराठी भाषेत बोलताना त्या थोड्या अडखळल्या, आणि हे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांच्यावर टीका आणि ट्रोलिंगची लाट उमटली. काही दिवस या व्हिडिओनेच सावंतवाडीच्या राजकारणात मोठी चर्चा रंगवली.
कोण आहेत श्रद्धा सावंत भोसले?
सावंतवाडी संस्थानच्या प्रतिष्ठित राजघराण्याशी श्रद्धा भोसले यांचे नाते आहे. त्या या संस्थानचे शेवटचे राजे आणि माजी आमदार दिवंगत श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या नातसून आहेत. त्यांच्या पती लखम सावंत भोसले हे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष असून राजकीय व सामाजिक कामाचा त्यांना मोठा वारसा लाभलेला आहे. श्रद्धा भोसले यांचा जन्म मुंबईत झाला. मूळ गुजरातमधील क्षत्रिय समाजातील असलेल्या श्रद्धा यांचे उच्च शिक्षण अमेरिकेत आणि लंडनमध्ये झाले आहे. 2019 मध्ये त्यांचा विवाह सावंतवाडीच्या राजघराण्यातील युवराज लखमराजे भोसले यांच्याशी झाला. कोकणात सासर आणि परदेशातील शिक्षण या दोन भिन्न पार्श्वभूमीमुळे श्रद्धा भोसले यांची प्रतिमा चर्चेत राहणे साहजिकच आहे.
हेही वाचा – राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंचा अर्ज छाननीत बाद; अनगर नगराध्यक्षपदासाठी BJP चा मार्ग मोकळा
मराठी भाषा शिकण्याचा त्यांचा प्रयत्न जाहीर मंचावर दिसला, पण भाषेतील अडचणींमुळे तेच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले. तरीही, सावंतवाडीला जागतिक पातळीवर नेणे आणि विकासाला गती देणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सावंतवाडी नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकूण ११ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी केवळ ६ अर्ज वैध ठरले आहेत. वैध उमेदवारांमध्ये
- भाजपा: श्रद्धा सावंत भोसले
- शिवसेना: अॅड. निता कविटकर
- काँग्रेस: साक्षी वंजारी
- उबाठा गट: सीमा मठकर
- अपक्ष: अन्नपूर्णा कोरगावकर, निशाद बुराण
राजकीय परंपरा, राजघराण्याचा वारसा, नव्या पिढीचा राजकारणात सहभाग या सर्व गोष्टींमुळे सावंतवाडीची निवडणूक सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे.


