राजगुरुनगर (पुणे) : महाराष्ट्रात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीची धूम सुरू असताना पुण्यातील राजगुरुनगर नगरपरिषदेत एका प्रभागातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील गावकऱ्यांनी नगरसेवक पदासाठी थेट ‘लिलाव’ ठरवल्याची चर्चा आहे.
सर्वसाधारण जागेसाठी तब्बल १ कोटी रुपयांची तर महिला राखीव जागेसाठी २२ लाख रुपयांची बोली लागल्याचे सांगितले जाते. अनेक उमेदवारांनी पैसे खर्च करून निवडणूक लढण्यापेक्षा बिनविरोध निवड करण्यासाठी हा अनोखा तोडगा काढला असल्याचे बोलले जाते. या लिलावातून जमा होणारे पैसे गावातील मंदिरे, सार्वजनिक इमारती आणि विकासकामांवर खर्च करण्याचा मानस आहे, अशी माहिती मिळत आहे.
राज्यात सध्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान होणार असून, ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजगुरुनगर परिषदेच्या एका प्रभागातील गावकऱ्यांनी वेगळा निर्णय घेतला. प्रभागात अनेक उमेदवार उभे राहून निवडणूक खर्च करणार, यापेक्षा बिनविरोध निवड करूया, असा ठाम निश्चय केला.
या प्रभागातून सर्वसाधारण जागेसाठी जे उमेदवार सर्वाधिक बोली लावतील, त्याला इतर सर्व उमेदवारांनी पाठिंबा देऊन आपले अर्ज मागे घेण्याचे ठरले आहे. त्याचप्रमाणे महिला राखीव जागेसाठीही सर्वाधिक बोली लावणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्याचा बेत आहे. बोलीत जिंकणारे दोन्ही उमेदवार आता प्रभागाचे नगरसेवक आणि नगरसेविका होण्याची शक्यता आहे, पण यासाठी बाकी उमेदवारांनी माघार घ्यावी लागेल. त्यामुळे हा ‘बोलीचा खेळ’ प्रत्यक्षात येईल का, हे माघारीनंतरच कळेल.
या लिलावाचे पैसे गावाच्या विकासासाठी वापरण्यात येतील, असा दावा केला जात आहे. यात गावातील मंदिरांची डागडुजी, सार्वजनिक इमारतींची साफसफाई, परिसर सुधारणा आणि इतर विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, हा प्रकार अधिकृतपणे कुणीही मान्य करत नसल्याने त्याच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह आहे. राजकीय वर्तुळात मात्र ही चर्चा तापली असून, निवडणूक आयोगाच्या लक्षात येईल की नाही, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.


