Dharmendra Death : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि सर्वांच्या मनातील ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांनी काल (२४ नोव्हेंबर) वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडसह संपूर्ण देशात मोठी शोककळा पसरली आहे.
‘शोले’तील विरूच्या निधनानंतर जय म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन यांनी भावुक पोस्ट केली आहे. अमिताभ बच्चन यांनी जवळच्या मित्राला अखेरचा निरोप दिल्यानंतर एक्सवर पोस्ट करत रात्री अडीच वाजता भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. बिग बींना धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
धर्मेंद्र यांच्या आठवणीत अमिताभ बच्चन भावुक
“आणखी एक दिग्गज आपल्याला सोडून गेला.. तो आता आपल्यातून कायमचा निघून गेला आहे..तो मागे एक असह्य अशी भयाण शांतता सोडून गेला आहे.. धरमजी…महानतेचे प्रतीक, ते केवळ त्यांच्या दिसण्यासाठी नाही तर त्यांच्या मोठ्या मनासाठी आणि साधेपणासाठी कायम ओळखले जायचे.
..ते पंजाबमधील गावातील मातीचा सुगंध आपल्याबरोबर घेऊन आले होते आणि ते जिथून आले होते, त्याच मूळ स्वभावाबरोबर कायम प्रामाणिक राहिले.. एक असं क्षेत्र जिथे प्रत्येक दशकात बदल होत राहिले, पण ते मात्र कधीच बदलले नाहीत.
त्यांचं हसणं, त्यांचा रुबाब, त्यांचं प्रेम त्यांच्या सभोवताली असलेल्या प्रत्येकाला जाणवायचं. या गोष्टी या इंडस्ट्रीत फार कमी पाहायला मिळतात. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे, ती पोकळी कायम राहील,” अशी पोस्ट अमिताभ बच्चन यांनी केली आहे.


