Nashik Crime News: नाशिकच्या हिरावाडी परिसरात एक भयावह घटना उघडकीस आली असून, लग्नाला अवघे सहा महिने झालेलेल्या नवविवाहितेने मानसिक छळ आणि चारित्र्यावर वारंवार करण्यात आलेल्या शंकेला कंटाळून विष प्राशन करून आपल जीवन संपवलं. नेहा पवार असे या युवतीचे नाव असून, तिने हे पाऊल उचलण्याआधी सात पानी सुसाईड नोट लिहून तिच्या वेदना सांगितल्या. या नोटच्या आधारे पंचवटी पोलिसांनी पतीसह सासू आणि नणंद या तिघांवर गुन्हा नोंदवला आहे.
चारित्र्यावर संशय
नेहाच्या सात पानी चिठ्ठीत केलेले आरोप हादरवून टाकणारे आहेत. लग्नानंतर पतीने शारीरिक संबंधाच्या वेळी ‘सील ब्लड’ न आल्याचा आक्षेप घेत तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे तिने नमूद केले आहे. जवळपास पंधरा ते वीस दिवस यामुळे तिला मानहानी सहन करावी लागली इतकेच नव्हे तर ६ सप्टेंबर २०२५ रोजी मासिक पाळी आल्यावरही सासूला तिच्यावर विश्वास नव्हता. पाळी खरी आहे की खोटी, हे तपासण्यासाठी नणंदेला ‘पॅड लावून तपास’ अशी सांगण्यात आल्याचा नेहाने गंभीर आरोप केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, पतीने देखील पाळी आली की नाही हे स्वतः तपासले.
मानसिक छळच माझ्या मृत्यूला कारणीभूत
चिठ्ठीत नेहाने लिहिले आहे की तिचे लग्न ४ जून २०२५ रोजी मोठ्या थाटामाटात पार पडले. सासरकडून हुंडा नको सांगितला असतानाही सोन्या-चांदीचे दागिने आणि घरातील भांडी देण्याचा तगादा लागला. तिने पुढे म्हटले आहे की, घरकाम येत नाही, मोबाइलवर बोलते, खर्च जास्त करते, असे टोमणे सासरच्या मंडळीकडून मारण्यात येत असल्याचंही नेहाने सांगितलं आहे. तथापी, पतीचे लग्नाआधीपासून एका मुलीसोबत संबंध असल्याचेही त्यानेच मला सांगून दोघांचे अश्लील फोटो दाखवले होते, असंही नेहाने म्हटले आहे.
हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का! अकोल्यातील तरुण पदाधिकारी वैभव घुगेंची रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या
माझी चिठ्ठी लपवली जाईल या भीतीने फोटो काढून ठेवले
नेहाने चिठ्ठीत लिहिले की, सासरचे माझी चिठ्ठी लपवतील म्हणून तिचे फोटो काढून माझ्या भावाला आणि ओळखीच्या लोकांना पाठवत आहे. माझे नशीबच खराब; मला सासर चांगले मिळाले नाही, असंही नेहाने म्हटलं आहे. नेहाने आत्महत्येपूर्वी लिहिले आहे की, नांदायला आल्यानंतर पतीने दोनदा मारहाण केली. ‘माहेरी कोणासोबत संबंध असतील’ असे संशयाचे वारंवार टोमणे मारले जात असल्याचे तिने नमूद केले.
पोलिसांचा तपास सुरू
या आत्महत्येच्या प्रकरणात पोलिसांनी पती, सासू आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. नेहाच्या सुसाईड नोटमुळे घरगुती छळ, चारित्र्यावर संशय आणि मानसिक अत्याचाराचे गंभीर स्वरूप पुन्हा एकदा समोर आले आहे.


