पाटणा: बिहार लोकसेवा आयोगाची (बीपीएससी) परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी पाटण्यातील गांधी मैदानात आमरण उपोषणावर बसलेले जन सुराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांना सोमवारी पहाटे अटक करण्यात आली. पोलिसांनी मध्यरात्रीतूनच किशोर आणि त्यांच्या समर्थकांना आंदोलन स्थळावरून उचलले. यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २५ हजार रुपयांचा बाँड आणि पुन्हा बेकायदा आंदोलन करणार नसल्याचे शपथपत्र लिहून देण्यास सांगत सशर्त जामीन दिला.
परंतु, किशोर यांनी सशर्त जामीन घेण्यास नकार दिला. मी जामीन घेणार नाही आणि उपोषणदेखील थांबवणार नाही, असे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे न्यायालयाने त्यांना १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवले. बीपीएससीने १३ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप करत ती रद्द करण्याच्या मागणीसाठी प्रशांत किशोर यांनी २ जानेवारीपासून आंदोलन सुरू केले आहे.


