Sonam Raghuvanshi Bail: इंदूरमधील ‘राजा रघुवंशी हत्या’ प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशीला शिलाँग न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.राजा आणि सोनम रघुवंशी यांचा विवाह ११ मे २०२५ रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. संसाराची नवी स्वप्ने घेऊन हे नवदाम्पत्य २० मे रोजी हनिमूनसाठी मेघालयच्या निसर्गरम्य वातावरणात पोहोचले. मात्र, हा आनंद केवळ औटघटकेचा ठरला. २३ मे रोजी चेरापुंजी येथील होमस्टेमधून बाहेर पडलेले हे जोडपे अचानक बेपत्ता झाले आणि संपूर्ण प्रकरणात एक भयानक वळण आले. पुढे २ जून रोजी ‘वेई सावडाँग’ येथील एका दुर्गम दरीत राजाचा छिन्नविछिन्न मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.
प्रियकरासोबत संगनमत करून रचला कट
तपास यंत्रणांनी केलेल्या सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. सोनमचे लग्नापूर्वीपासूनच तिच्या वडिलांकडे काम करणाऱ्या राज कुशवाह या तरुणाशी प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही हे संबंध सुरूच असल्याने तिने पती राजाला कायमचे वाटेतून दूर करण्याचा कट रचला. राज कुशवाह आणि त्याच्या साथीदारांनी मेघालयमध्ये राजाचा पाठलाग केला आणि एका निर्जन ठिकाणी त्याला टेकडीवरून खोल दरीत ढकलून दिले. या क्रूर कृत्यात राज कुशवाहसह विशाल सिंग चौहान, आकाश सिंग राजपूत आणि आनंद कुर्मी या साथीदारांचाही समावेश होता, ज्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
महत्त्वाच्या कायदेशीर घडामोडी आणि फॉरेन्सिक पुरावे
या प्रकरणाचा तपास करत असताना फॉरेन्सिक रिपोर्टमधून महत्त्वाची माहिती उघड झाली. राजाच्या अंगावर पाठीमागून वार करण्यात आले होते आणि त्यानंतर त्याला दरीत फेकले गेले होते, हे पुराव्यांवरून सिद्ध झाले. दरम्यान, हत्येनंतर सोनमने उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे शरणागती पत्करली होती, त्यानंतर ९ जून २०२५ रोजी तिला रीतसर अटक करण्यात आली. यापूर्वी डिसेंबर २०२५ मध्ये न्यायालयाने गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत तिचा जामीन अर्ज फेटाळला होता, मात्र आता तिला जामीन मंजूर झाला आहे.
पीडित कुटुंबाचा न्यायासाठी टाहो
राजा रघुवंशीच्या कुटुंबीयांनी सोनमला मिळालेल्या जामिनावर तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. “आमच्या मुलाचा क्रूरपणे बळी घेणाऱ्या आरोपीला जामीन मिळणे दुर्दैवी आहे. आम्ही या निर्णयाविरोधात वरच्या न्यायालयात दाद मागू आणि शेवटच्या श्वासापर्यंत न्यायासाठी लढा देऊ,” अशी संतप्त भावना राजाच्या भावाने व्यक्त केली आहे. या घटनेमुळे इंदूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


