Pune Child Death: खेळण्याच्या वयात मृत्यूने झडप घातल्याची एक हृदयद्रावक घटना जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे समोर आली आहे. मंगळवारी दुपारी दोन चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून अंत झाल्याने संपूर्ण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे ग्रामीण भागातील उघड्या शेततळ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
खेळता खेळता घडला घात
मिळालेल्या माहितीनुसार, बल्लाळवाडी येथील गाडेकर यांच्या शेतात ही दोन्ही मुले दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास खेळत होती. घराशेजारीच असलेल्या शेततळ्याचा अंदाज न आल्याने ही मुले पाण्यात पडली. मुले बराच वेळ नजरेसमोर न दिसल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. अखेर मुले शेततळ्यात पडल्याचे लक्षात येताच पालकांनी हंबरडा फोडला. या घटनेत प्राण गमावलेली मुले पवार आणि नवले कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
बचाव पथकाकडून मृतदेह बाहेर
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. स्थानिक प्रशासन आणि रेस्क्यू टीमला तातडीने बोलावण्यात आले. बचाव पथकाने पाण्यात शोधमोहीम राबवून दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. या दोन्ही निरागस बालकांचा असा अंत झाल्याने उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.
उघडी शेततळी ठरतायत ‘डेथ ट्रॅप’
शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार देणारी शेततळी मुलांसाठी मात्र जीवघेणी ठरत आहेत. या घटनेमुळे परिसरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक शेततळ्यांना संरक्षक जाळी किंवा कुंपण नसल्याने अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत. पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत असून, नागरिकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे आणि शेततळ्यांभोवती सुरक्षा कवच उभारावे, असे आवाहन करण्यात येत आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यासाठी त्यांना स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जुन्नर तालुक्यात या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


